
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा सेवाभावी अन्नदान उपक्रम
लातूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) : न्यायदानाबरोबरच समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूरच्या वतीने शासकीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व रुग्णालय येथे दाखल असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सेवाभावी अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमातून शेकडो गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाचे वाटप करण्यात आले.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या अनेक रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही अनेक दिवस मुक्कामी राहत असल्याने त्यांच्यासाठी भोजनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. भोजन वाटपावेळी मान्यवरांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे उमा भारुका यांनी स्वतः पुढाकार घेत सहकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण भोजनाची तयारी स्वतःच्या देखरेखीखाली केली. प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत स्वच्छ, पौष्टिक आणि प्रेमाने तयार केलेले भोजन पोहोचावे यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय भारुका, धर्मादाय सहआयुक्त विद्याधर मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, उमा भारुका, प्रमिला भोसले, अश्विनी जाधव, रंजना मोरे, चेतना पाटील तसेच कौसर जमादार उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी स्वतः भोजन वाटप करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.
यावेळी न्यायव्यवस्था ही केवळ न्यायदानापुरती मर्यादित नसून समाजातील गरजू, दुर्बल आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीदेखील सामाजिक जबाबदारी असल्याचे मान्यवरांनी सांगितले. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भोजन स्वीकारल्यानंतर अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. भविष्यातही अशा लोकहितकारी आणि सेवाभावी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या अन्नदान उपक्रमातून न्यायव्यवस्थेची सामाजिक बांधिलकी आणि मानवतेप्रती असलेली संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis