
अमरावती, ४ ऑगस्ट (हिं.स.) : मेळघाटातील दुर्गम चिखलदरा तालुक्याला अखेर कायमस्वरूपी तालुका वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने डॉ. अभिषेक नायडू यांची तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याने अनेक दिवसांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाला स्थैर्य मिळणार आहे.
आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यात आरोग्य सुविधांवर मोठा ताण असून, कायमस्वरूपी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी प्रशासकीय तसेच आरोग्यविषयक कामकाजात अडचणी निर्माण होत होत्या. शासनाच्या नुकत्याच झालेल्या नियुक्त्यांमध्ये डॉ. अभिषेक नायडू यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील समन्वय अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून, माता-बाल आरोग्य, लसीकरण, विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांची अंमलबजावणी तसेच साथीच्या रोगांवरील नियंत्रण अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कायमस्वरूपी तालुका वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने नागरिक, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, या निर्णयामुळे मेळघाटातील दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी