किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय, दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
मुंबई, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, सरकारी वकील कार्यालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या न्या
किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय, दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता


मुंबई, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, सरकारी वकील कार्यालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या न्यायिक अधिकारी व सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या पदांमधून या तीनही आस्थापनांसाठी आवश्यक पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी १९ नियमित व ६ बाह्य यंत्रणेमार्फत पदे, सरकारी वकील कार्यालयासाठी ३ नियमित व १ बाह्य यंत्रणेमार्फत पद, तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरासाठी २१ नियमित व ४ बाह्य यंत्रणेमार्फत पदे मंजूर करण्यात आली आहेत.

अशाप्रकारे या तीनही संस्थांसाठी मिळून ४३ नियमित आणि ११ बाह्य यंत्रणेमार्फत पदे, अशी एकूण ५४ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे किनवट व परिसरातील नागरिकांना जिल्हा व सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालयाची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी दूरवर जावे लागणार नाही, प्रकरणांच्या निपटाऱ्याला गती मिळेल आणि नागरिकांना अधिक सुलभ, जलद व परिणामकारक न्यायसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या न्यायालयांसाठी आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांची पदे त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande