
डोंबिवली, ४ ऑगस्ट (हिं.स.) :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्रांनी पुन्हा एकदा निर्णायक लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. ‘दिबांची वारी, दिल्लीच्या द्वारी’ या संकल्पनेतून ५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे भव्य लाक्षणिक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी असून, केंद्र शासनाचे लक्ष वेधून विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यास अंतिम मंजुरी मिळावी, हा या आंदोलनामागील प्रमुख उद्देश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आगरी समाजासह विविध भूमिपुत्र संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते कोणताही पक्षभेद न करता दिबा पाटील यांच्या नावासाठी सातत्याने आंदोलन, उपोषणे आणि जनजागृती करत आहेत. या सातत्यपूर्ण संघर्षाची दखल घेत राज्य शासनाने विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यास मान्यता दिली आहे. मात्र, केंद्र शासनाची अंतिम मंजुरी अद्याप प्रलंबित आहे.
याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करून केंद्र सरकारपर्यंत मागणीचा आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मागणीला अधिक बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी भूमिपुत्र, आगरी समाजबांधव आणि दिबा पाटील समर्थकांना केले आहे.
यासंदर्भात आमदार राजेश मोरे यांनीही सर्व भूमिपुत्रांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राज्य शासनाने नाव देण्यास मान्यता दिली असली तरी केंद्र शासनाची मंजुरी बाकी असल्याने आता दिल्लीच्या जंतरमंतरवर एकत्र येऊन न्याय्य मागणीचा बुलंद आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.
पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्व भूमिपुत्रांनी ५ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन आमदार राजेश मोरे यांनी केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi