
रायगड, 04 ऑगस्ट, (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील ४६ गावे आणि ३३ आदिवासी वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित उमटे धरणाचा प्रश्न आगामी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत प्राधान्याने चर्चेस घ्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन शरद राऊळ यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उमटे धरणावर हजारो नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि शेतकऱ्यांची शेती अवलंबून असल्याने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे डॉ. राऊळ यांनी नमूद केले. धरणातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी शासनाकडे निधी मिळविण्यासाठी आतापर्यंत कोणते प्रयत्न झाले, याचा सविस्तर अहवाल सभागृहात सादर करण्याची त्यांनी मागणी केली.
सन १९९५ पासून शासनाकडे किती वेळा निधीची मागणी करण्यात आली, किती निधी मंजूर झाला, त्यापैकी किती खर्च झाला, जलसंपदा विभागाकडे कोणते प्रस्ताव पाठविण्यात आले, धरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला का, तसेच वरिष्ठ स्तरावरील बैठकीतील निर्णय काय झाले, याची माहिती सभागृहासमोर ठेवावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
धरणावर बसविण्यात आलेल्या वॉटर फिल्टरमुळे पाण्याचा दाब कमी होऊन अनेक गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. चुकीच्या क्षमतेचा फिल्टर बसवून सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नसल्यास शासन आणि जलसंपदा विभागाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून आवश्यक निधी मंजूर करून घ्यावा आणि आगामी सर्वसाधारण सभेत उमटे धरणाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा डॉ. सचिन राऊळ यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)