
परभणी, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिंतूर शहर संपर्क कार्यालयात जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर व तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकार्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय साधून पक्षविस्तारासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमास जिल्हाप्रमुख रविंद्र धर्म, युवासेना समन्वयक दिलीपराव घुगे, सहसंपर्क प्रमुख गंगाप्रसाद घुगे, उपजिल्हाप्रमुख भारत पवार, तालुकाप्रमुख किरण देशमुख, रितेश पांडे, शहरप्रमुख अरविंद कटारे तसेच शहर संघटक कांतराव धानोकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपतालुकाप्रमुखपदी मुरली मस्के, जनार्दन मते व आनंद गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. उपशहरप्रमुख म्हणून अभय पुणेकर व अलबला शेख यांना जबाबदारी देण्यात आली. संघटक प्रमुखपदी कैलास गायकवाड, श्रीराम नेवरे, परमेश्वर ठोंबरे, बाळू सावकार आणि गजानन पायघण यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपसंघटक प्रमुख म्हणून जनार्दन शिंदे, नितीन पंडघन, मदन पवार, संतोष पांडुरे आणि संदीप रगडे यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित नेत्यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक गाव व प्रभागात सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास जिंतूर शहर व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे संघटनेला नवचैतन्य मिळाल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis