छ. संभाजीनगर - तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजना अंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना, राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वसुर, सहारा सामाजिक
Q


छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजना अंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना, राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वसुर, सहारा सामाजिक विकास संस्था, चांदई ठोंबरी, ता. भोकरदन, जि. जालना तसेच गरु आशीर्वाद किन्नर समाज चॅरिटेबल ट्रस्ट, जि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास परीविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. रंगामंजू यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी तृतीयपंथीयांच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

कार्यक्रमामध्ये तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कायदेशीर हक्क, शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, ओळखपत्रे, सामाजिक सुरक्षा तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम, शासनाच्या कल्याणकारी योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून लाभ मिळविण्याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. संजय राठोड यांनी तृतीयपंथीयांच्या व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वाढ आणि सामाजिक नेतृत्व या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान अहिल्यानगर येथील तृतीयपंथीय प्रतिनिधी श्रीमती दिशा पिंकी शेख यांनी तृतीयपंथीयांच्या विविध समस्या, सूचना व अपेक्षा मांडल्या. त्यांनी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी शासन नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमात तृतीयपंथीयांचे गुरु मोहम्मद शकीफ बक्ष (काजल गुरु नानी) यांनी समाजातील एकजूट, शिक्षण, स्वावलंबन आणि शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.कार्यशाळेच्या निमित्ताने तृतीयपंथीयांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये उपस्थितांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला.

तसेच आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आदी तपशील अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका (रेशन कार्ड) दुरुस्ती, नवीन नोंदणी, नाव समाविष्ट करणे तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीतील लाभांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

आरोग्य विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व उपलब्ध आरोग्य सुविधांविषयी माहिती देण्यात आली. याशिवाय, तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, 2019 अंतर्गत उपलब्ध कायदेशीर अधिकार, संरक्षणात्मक तरतुदी तसेच विविध शासकीय योजनांमधील लाभांविषयी सविस्तर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करून त्यांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरीदास भोपळे वरीष्ठ लिपीक व निलेश लक्कस कनिष्ठ लिपीक यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. अनिता राठोड सहायक आयुक्त समाज कल्याण जालना यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती स्नेहल मोदाळे, विशेष अधिकारी, शासकीय निवासी शाळा, जालना यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वसुर, यांचे अध्य्क्ष योगेश पाटील सहारा सामाजिक विकास संस्था, चांदई ठोंबरी यांचे अध्यक्ष सय्यद सर आणि गरु आशीर्वाद किन्नर समाज चॅरिटेबल ट्रस्ट, जालना तृतीयपंथीयांचे गुरु मोहम्मद शकीफ बक्ष (काजल गुरु नानी) पदाधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या माध्यमातून तृतीयपंथीय समाजाला त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभघेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमास तृतीयपंथीय समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी कार्यक्रमास सहायक आयुक्त समाज कल्याण जालना कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande