
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। महसूल विभाग हा प्रशासनाचा महत्त्वाचा कणा असून, विविध प्रश्न व जबाबदाऱ्या प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता या विभागात आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्येक जबाबदारी निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पाडत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत (आरटीएस) प्रकरणांचा विहित मुदतीत निपटारा करून हिंगोली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतही जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजूषा मूथा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरवदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावरील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कामाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून येणाऱ्या अडचणींवर मात करावी. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना त्यांनी भविष्यातही हिंगोली जिल्ह्याची कामगिरी राज्यासाठी आदर्श ठरेल, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच महसूल कर्मचाऱ्यांसाठी महसूल वसाहत उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेतून तसेच गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालये सुसज्ज व अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis