लातूरमध्ये खत टंचाई आणि पीकविमा प्रश्नावर शेतकरी संघटनेचा कृषी कार्यालयावर धडक मोर्चा
लातूर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर रासायनिक खत उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत, खताचा कथित काळाबाजार, कर्जमाफीतील अनियमितता आणि पीकविमा योजनेंतर्गत अनेक शेतकरी अद्यापही वंचित असल्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनेच्या वतीने प्
शेतकरी संघटनेच्या कृषी अधीक्षकांना घेराव


लातूर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर रासायनिक खत उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत, खताचा कथित काळाबाजार, कर्जमाफीतील अनियमितता आणि पीकविमा योजनेंतर्गत अनेक शेतकरी अद्यापही वंचित असल्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर जोरदार धडक देण्यात आली. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना घेराव घालत विविध प्रश्नांचा भडीमार केला.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी खताचा तुटवडा असून काही खत विक्रेत्यांकडून काळाबाजार होत असल्याचा आरोप केला. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसून पीकविमा योजनेंतर्गतही अनेक अर्जदार अद्याप वंचित असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षकांना विविध प्रश्न विचारले. मात्र, या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा दावा आंदोलकांनी केला. संबंधित विषय राज्य शासनाच्या स्तरावरील असल्याचे सांगत कृषी अधीक्षकांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी शेतकऱ्यांच्या विविध अडचणींचा पाढा वाचत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. खत वितरणातील कथित गैरव्यवहार, कर्जमाफीतील त्रुटी आणि पीकविमा योजनेतील विलंबामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande