हिंगोलीतील प्रस्तावित एमआयडीसी विकासाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : हिंगोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रांच्या विकास प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील प्रस्ताव
हिंगोलीतील प्रस्तावित एमआयडीसी विकासाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : हिंगोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रांच्या विकास प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील प्रस्तावित अतिरिक्त हिंगोली एमआयडीसी अंतर्गत मौजे वारंगा फाटा, दाभाडी आणि कुर्तडी येथील सामायिक क्षेत्रातील 432.26 हेक्टर जमीन प्रस्तावित आहे. तसेच मौजे कामठा, येलकी, जरोडा आणि डोंगरगाव पूल येथील सामायिक क्षेत्रातील 205.79 हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे.

या दोन्ही प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक ती कार्यवाही करून संबंधित विभागांनी समन्वयाने पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावर लॉजिस्टिक पार्क उभारण्याची शक्यता तपासण्याच्या सूचनाही त्यांनी नांदेड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी आवश्यक नियोजन आणि कार्यवाही करण्यावर त्यांनी भर दिला.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, व्यवस्थापक रविंद्र पत्की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या भूमापक श्रीमती एस. व्ही. फड तसेच संबंधित गावांचे तलाठी उपस्थित होते.

येलकी येथील सशस्त्र सीमा दलाच्या बटालियनला भेट

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील 16 वी बटालियन सशस्त्र सीमा दलाला भेट देऊन पाहणी केली.

यानंतर त्यांनी कळमनुरी येथील नमो गार्डनला भेट देऊन वृक्षारोपण केले. तसेच ढोलक्याची वाडी येथील व्यायामशाळेची पाहणी केली. कळमनुरी ते ढोलक्याची वाडी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

जिल्ह्यात औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबतच विविध विकासकामांना गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande