
डोंबिवली, 04 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या डोंबिवली पश्चिम मंडळ माध्यमातून अनमोल वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील डिलिव्हरी बॉयंसाठी मोफत पेट्रोल वाटपाचा अनोखा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कष्टकरी आणि अहोरात्र सेवा बजावणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम बुधवार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत डोंबिवली पश्चिम येथील चिंचोली पाडा, रागाई मंदिराजवळील एकवीरा पेट्रोल पंप येथे आयोजित करण्यात आला आहे. कष्टाळू डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे.
ऑनलाइन खरेदी आणि घरपोच सेवा मोठ्या प्रमाणात वाढल्याने डिलिव्हरी बॉय नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. कोणत्याही हवामानात वेळेवर सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत भाजपच्या वतीने त्यांना मोफत पेट्रोल देऊन गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी कंपनीचे मूळ ओळखपत्र आणि अधिकृत युनिफॉर्म परिधान करून उपस्थित राहणे आवश्यक आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi