
यवतमाळ, ४ ऑगस्ट (हिं.स.) : शालेय परिसरात विक्री होणाऱ्या तळलेल्या पदार्थांसह जंक फूड, चॉकलेट्स आणि एनर्जी ड्रिंकवर निर्बंध घालण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे आर्णी तालुक्यातील शाळा-महाविद्यालय परिसरातून वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी, समोसे यांसारखे पदार्थ विक्रीला आळा बसणार असून, पालकवर्गातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात तळलेले पदार्थ तसेच जंक फूड मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, हे पदार्थ विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाने शाळेपासून ५० मीटरच्या परिसरात अशा पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घातला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यास अपायकारक पदार्थांपासून दूर ठेवण्यास मदत होणार असल्याचे पालकांनी सांगितले. शालेय वयात चुकीच्या आहारामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शालेय परिसरात तळलेले पदार्थ, जंक फूड, चॉकलेट्स आणि एनर्जी ड्रिंकची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासन संयुक्तपणे कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी