
अमरावती, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर तिवसा बसस्थानकासमोर मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) दुपारी सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास महिंद्रा थार आणि बुलेरो पिकअप वाहनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या दिशेने जाणारी महिंद्रा थार (क्र. एमएच १४ केएन ५६७८) ही चारचाकी गाडी तिवसा बसस्थानकासमोरील स्पीड ब्रेकरवरून जात असताना चालकाने वाहनाचा वेग कमी करून ब्रेक लावले. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येत असलेल्या मालवाहू बुलेरो पिकअप (क्र. एमएच ४० वाय ४२८१) ने थारला जोरदार धडक दिली.धडकेची तीव्रता इतकी होती की, थार वाहन काही अंतर घासत गेले. त्यामुळे वाहनाचा मागील टायर फुटला तसेच इतर भागांचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान, धडकेनंतर बुलेरोपिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावरील लोखंडी दुभाजकावर जाऊन अडकले.
विशेष बाब म्हणजे, अपघात झाला त्यावेळी शाळा सुटण्याची वेळ असल्याने परिसरात विद्यार्थ्यांची व नागरिकांची वर्दळ होती. अशा परिस्थितीतही कोणालाही इजा झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासह पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही केली. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नसून, पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी