
रायगड, 04 ऑगस्ट (हिं.स.)। : कोकणातील कथित जमीन घोटाळ्यांवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून महसूल विभागातील अनियमित व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अलिबाग येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी परस्पर जमिनींची विक्री, महसूल नोंदीतील गैरप्रकार आणि वारस नसलेल्या जमिनींच्या प्रकरणांची विशेष तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले.
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथील कथित जमीन घोटाळ्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर बावनकुळे यांनी दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला. या प्रकरणांच्या चौकशीसाठी १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत समिती कोकणात विविध प्रकरणांची तपासणी करणार आहे.
कोकणातील हजारो जमीन व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, मालक किंवा वारस नसलेल्या अनेक जमिनी नियमानुसार सरकार जमा होणे अपेक्षित असतानाही तसे झाले नसल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. अशा सर्व जमिनींची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महसूल प्रशासनाला अंधारात ठेवून गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मिळकतखार प्रकरणातील संबंधित तलाठी व तत्कालीन अधिकाऱ्यांविरुद्ध बदली आणि खातेनिहाय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महसूल विभागातील गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, प्रलंबित जमीन घोटाळ्यांची प्रकरणेही उघडकीस येण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)