इराणकडे चर्चेसाठी शेवटची संधी - ट्रम्प
वॉशिंग्टन , 04 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, इराणसोबतची चर्चा लवकरच काही ना काही निष्कर्षापर्यंत पोहोचेल. “ही फार कठीण गोष्ट नाही. आपण होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत बोलत आहोत. ती प्रत्यक्षात
इराणकडे चर्चेसाठी शेवटची संधी - ट्रम्प


वॉशिंग्टन , 04 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, इराणसोबतची चर्चा लवकरच काही ना काही निष्कर्षापर्यंत पोहोचेल. “ही फार कठीण गोष्ट नाही. आपण होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत बोलत आहोत. ती प्रत्यक्षात मंगळवारपर्यंत खुली केली जाईल. पूर्णपणे खुली केली जाईल,” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात अणु कार्यक्रमाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. “या प्रकरणात आमची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यांच्याकडे (इराणकडे) अण्वस्त्रे असू शकत नाहीत. चर्चा अद्याप सुरू आहे. त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. चांगल्या करारावर स्वाक्षरी करण्याची ही त्यांची अंतिम संधी आहे,” असे त्यांनी म्हटले.

दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी ट्रम्प यांच्या ‘अप्रत्यक्ष चर्चां’बाबतच्या दाव्याचे स्पष्टपणे खंडन केले. माध्यमांशी बोलताना बघाई म्हणाले की, कोणत्याही प्रतिनिधीचे स्वागत करण्याची किंवा चर्चेसाठी कोणाला पाठवण्याची आमची कोणतीही योजना नाही. सध्या आमची अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही.यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वासमोर दोन पर्याय ठेवले होते — करार करा किंवा पूर्णपणे शरणागती पत्करा. ट्रम्प यांनी ही चेतावणी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका विस्तृत निवेदनाद्वारे दिली होती.

या निवेदनात ट्रम्प यांनी इराणी नेतृत्वावर “दुटप्पी भूमिका” घेतल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की, इराण सुरुवातीला चर्चेसाठी “विनवण्या करत होता”, मात्र नंतर सार्वजनिकरीत्या अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी लिहिले की, इराणने हे मान्य केले किंवा नाही, पण त्यांनी अनेक दशकांपासून निर्माण केलेल्या समस्येच्या तोडग्याबाबत आम्ही प्रत्यक्षात चर्चा करत आहोत.

ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणच्या दाव्यांनाही फेटाळून लावले. हा समुद्री मार्ग जगासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी म्हटले की, इराण होर्मुझवर आपले नियंत्रण असल्याचा दावा करत असला, तरी हा परिसर आधीपासूनच अमेरिकन नौदलाच्या नियंत्रणाखाली असून तेथे त्यांची “नाकेबंदी” किंवा “लोखंडी भिंत” उभी आहे. ट्रम्प म्हणाले की, या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक पूर्णपणे अमेरिकेच्या इच्छेवर अवलंबून असेल. “आमची परवानगी मिळाल्याशिवाय इराणपर्यंत काहीही पोहोचणार नाही. आणि कोणताही करार होईपर्यंत किंवा पूर्ण शरणागती पत्करली जाईपर्यंत काहीही पोहोचणार नाही असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande