
पुणे, ४ ऑगस्ट (हिं.स.) : “प्रकल्पाच्या नावाखाली फसवणूक केल्याने अटक” अशा आशयाच्या बातम्या आणि सोशल मीडियावरील संदेशांमुळे गैरसमज निर्माण होत असल्याने महाराष्ट्र ऍग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाने स्पष्टीकरण जारी केले आहे.या फसवणुकीच्या बातम्यांचा मॅग्नेट प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, शेतकरी व नागरिकांनी अशा भूलथापा आणि तोतयेगिरीला बळी पडू नये, असे आवाहन प्रकल्प प्रशासनाने केले आहे.
मॅग्नेट प्रकल्पाचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची काढणीनंतर होणारी नासाडी कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे. या प्रकल्पात फळपिके आणि फुलपिकांचा समावेश असून, आशियाई विकास बँकेच्या आर्थिक सहकार्याने महाराष्ट्र शासनामार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
प्रकल्पांतर्गत राज्यातील १४ प्रमुख फळपिके आणि विविध फुलपिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये रोपवाटिका विकास, नवीन वाणांचा प्रसार, शेतकरी उत्पादक संस्थांचे सक्षमीकरण, आधुनिक शेती तंत्रज्ञान, काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विकास तसेच सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारणीचा समावेश आहे.
मॅग्नेट प्रकल्पामध्ये समाविष्ट पिकांच्या मूल्यसाखळी विकासासाठी शेतकरी उत्पादक संस्था आणि गुंतवणूकदारांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत नवीन व विद्यमान सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.
प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मॅग्नेट प्रकल्पात गुंतवणूक केल्यास व्याज किंवा परताव्याचे कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फसव्या संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रकल्पाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रकल्पासंदर्भातील अधिकृत माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी मॅग्नेट प्रकल्पाचे अधिकृत संकेतस्थळ यावर भेट द्यावी, असे आवाहन प्रकल्प संचालक (मॅग्नेट प्रकल्प) यांनी केले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु