
नंदुरबार, ४ ऑगस्ट (हिं.स.) :भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी जाऊन मतदार पडताळणी तसेच गणनेचे नमुने डिजिटाईझ करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
या मोहिमेअंतर्गत ३० जून २०२६ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बीएलओंकडून गृहभेटी घेऊन मतदारांची माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आपले गणनेचे नमुने संबंधित बीएलओमार्फत किंवा ऑनलाइन पद्धतीने डिजिटाईझ करून घ्यावेत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी केले आहे.बीएलओ अधिकारी घरोघरी भेटी देत असताना नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्यांना सहकार्य करावे आणि मतदार यादी पुनरीक्षण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक :
बीएलओमार्फत गृहभेटी व EFs डिजिटाईझ प्रक्रिया : ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना : ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत
प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : १७ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६
दावे-हरकतींची छाननी व निकाल प्रक्रिया : १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : १९ ऑक्टोबर २०२६
या पुनरीक्षण कार्यक्रमानुसार १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर नागरिकांना १६ सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. प्राप्त हरकतींचा निपटारा केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी दिली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर