भुयारी गटार योजनेच्या कामाची महापौर जयश्री सोनकांबळे यांच्याकडून पाहणी
खोदलेल्या रस्त्यांचे तातडीने पॅचवर्क करण्याचे कंत्राटदारांना निर्देश लातूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) : लातूर शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाची महापौर जयश्री सोनकांबळे यांनी सोमवारी विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यामुळे
महापौरांकडून पाहणी


खोदलेल्या रस्त्यांचे तातडीने पॅचवर्क करण्याचे कंत्राटदारांना निर्देश

लातूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) : लातूर शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाची महापौर जयश्री सोनकांबळे यांनी सोमवारी विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यामुळे खोदलेल्या रस्त्यांवर निर्माण झालेला चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या अडचणींबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत महापौरांनी संबंधित कंत्राटदारांना रस्त्यांचे तातडीने पॅचवर्क करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना दिल्या.

लातूर शहरातील विविध भागांमध्ये भुयारी गटार योजनेची कामे वेगाने सुरू आहेत. या कामांसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, पावसाळ्यात या भागांमध्ये पाणी साचणे, चिखल होणे तसेच रस्त्यांची अवस्था खराब झाल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर महापौर जयश्री सोनकांबळे यांनी स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, सभागृह नेते विजयकुमार साबदे, सदस्य शिवाजी जवळगेकर, युनुस मोमीन, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवसागर मंठाळे तसेच संबंधित कंत्राटदारांसमवेत शहरातील विविध भागांची पाहणी केली.

पाहणीदरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक सूचना दिल्या. भुयारी गटार योजनेची कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. तसेच ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत, तेथे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन तातडीने पॅचवर्क करावे, असे निर्देश महापौरांनी कंत्राटदारांना दिले.

कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी नियोजन करणे आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यावरही यावेळी भर देण्यात आला.

महापौरांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामांवर नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. भुयारी गटार योजनेमुळे भविष्यात शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असले तरी कामाच्या काळात नागरिकांची गैरसोय कमीत कमी राहील, यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande