परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर बिनविरोध
मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा परभणी, ४ ऑगस्ट (हिं.स.) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲ
अ


मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा

परभणी, ४ ऑगस्ट (हिं.स.) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. सगळ्याच शर्यतीत भाग घ्यायचा नसतो; काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात! या आशयाच्या स्टेटसकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

तब्बल १४ वर्षांनंतर रामप्रसाद बोर्डीकर यांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर पुनरागमन केले आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

रामप्रसाद बोर्डीकर यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. विविध आव्हानांवर मात करत त्यांनी पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्थान मजबूत केल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.

समर्थकांच्या मते, या पुनरागमनामागे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची संघटनात्मक भूमिका, कार्यकर्त्यांशी सातत्याने ठेवलेला संपर्क आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरील प्रभावी पकड यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.

याच पार्श्वभूमीवर त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमधील सगळ्याच शर्यतीत भाग घ्यायचा नसतो; काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात! या संदेशाची राजकीय अर्थाने चर्चा होत आहे. संयम, योग्य वेळेची प्रतीक्षा आणि योग्य क्षणी मिळालेल्या यशाचा संदर्भ या स्टेटसमधून व्यक्त होत असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे.

रामप्रसाद बोर्डीकर यांच्या बिनविरोध निवडीमुळे परभणी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. मात्र, व्हॉट्सॲप स्टेटसचा अर्थ किंवा त्याचा या निवडीशी संबंध याबाबत अधिकृत भूमिका व्यक्त करण्यात आलेली नाही.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande