
नाशिक, 04 ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील रस्त्यांवर पडलेले धोकादायक खड्डे आणि पाइपलाइनच्या खोदकामामुळे निर्माण झालेल्या समस्येबाबत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू असतानाच 'महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड' (एमएनजीएल) कंपनीच्या अधिकाऱ्यांची बेफिकिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. स्वतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर थेट संपर्क साधून काल एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. अखेर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनीच संपर्क साधून या अधिकाऱ्यांना पुढील बैठकीबाबत सूचना दिल्या.
नाशिक शहरातील गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची चाळण झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यावरून नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सलग बैठकांना एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वीच तीव्र संताप व्यक्त केला होता.
त्यांनी दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांना खडसावत सोमवारी प्रत्यक्ष भेटून बाजू मांडण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, मंत्र्यांच्या या निर्देशानंतरही सोमवारी कंपनीचे अधिकारी फिरकलेच नाहीत. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएनजीएलकडून कोणताही संपर्क न झाल्याने अखेर महापालिकेनेच पुढाकार घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
एमएनजीएलच्या या मनमानी कारभाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी तातडीने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला. शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती, खोदकामाचा आढावा आणि समन्वयातील त्रुटींसंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीला कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहून प्रत्यक्ष अहवाल सादर करण्याची सूचना आयुक्त खत्री यांनी केली. दरम्यान, एमएनजीएल कंपनीचे प्रमुख भाजपचे माजी पदाधिकारी होते. काही मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांना नाशिकच्या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, भाजपच्याच कारकिर्दीत होत असलेल्या कामात विलंब करीत ते भाजपलाच अडचणीत आणत असल्याचे बोलले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV