
नाशिक, 04 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक महापालिका प्रभाग क्र. ९ मधील १०,९५० मतदारांची नावे इतर प्रभागांच्या मतदारयादीत समाविष्ट झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील, नगरसेविका संगीता घोटेकर, भारती धिवरे तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुराव्यांसह केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
प्रभाग क्र. ९ मधील रहिवाशांची नावे प्रभाग क्र. ८, १०, ९, २६ तसेच सिडको, चुंचाळे शिवार आदी भागांच्या मतदारयादीत समाविष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी विधानसभा निवडणूक २०२४ आणि नाशिक महापालिका निवडणूक २०२६ पूर्वीही त्रुटींबाबत निवेदने देऊनही अंतिम मतदारयादीत दुरुस्ती न झाल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला आहे.
तक्रारदारांनी १०,९५० मतदारांची नावे, भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मोबाईल क्रमांकांसह यादी प्रशासनाकडे दिली असून, सर्व नावे प्रभाग क्र. ९ च्या मतदारयादीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
चौकट :
लोकप्रतिनिधीच चुकीच्या मतदारयादीत; मग सामान्य नागरिकांचे काय?नाशिक मनपा प्रभाग क-९ चे नगरसेवक अमोल दिनकर पाटील हे जन्मापासून प्रभाग क-९ चे रहिवासी असतानाही त्यांचे नाव आता भाग क्रमांक १३२ मध्ये दाखविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांचा पत्ता चेतनानगर, सिडको असा नमूद असून त्यांना एसआयआर फॉर्मही उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचा आरोप आहे. लोकप्रतिनिधींच्याच बाबतीत अशी स्थिती असेल तर सामान्य मतदारांचे काय, असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV