लातूर - शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड नाही; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
लातूर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत लातूर जिल्हा पोलीस दलाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. दिनांक 3 ऑगस्ट रोजी एका प्रवासी ऑटो मध्ये वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन
पोलीस कारवाई


लातूर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत लातूर जिल्हा पोलीस दलाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. दिनांक 3 ऑगस्ट रोजी एका प्रवासी ऑटो मध्ये वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत ऑटो चालकाने त्याच्या ऑटो मध्ये क्षमतेपेक्षा अधिक 13 लहान विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या संबंधित वाहनचालकावर वाहतूक शाखेमार्फत मोटार वाहन कायदा 66/192 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

लातूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक, निष्काळजी वाहनचालक, आवश्यक सुरक्षा उपायांचा अभाव किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू असून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे.

याप्रसंगी सर्व शाळा व्यवस्थापन, शालेय बस व ऑटो-रिक्षा चालक, वाहनधारक तसेच पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही, याची जबाबदारी संबंधित संस्था, चालक आणि पालकांनीही घ्यावी.

यापुढे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ करणारी कोणतीही घटना आढळून आल्यास संबंधित चालक, वाहनधारक, शाळा व्यवस्थापन तसेच आवश्यकतेनुसार संबंधित पालकांविरुद्धही प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा लातूर जिल्हा पोलीस दलाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande