
डोंबिवली, 04 ऑगस्ट (हिं.स.)।कुर्ल्यातील मामासोबत झालेल्या वादाच्या रागातून एका मूकबधिर तरुणाने आपल्या एक वर्षीय मामाच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत डोंबिवली पश्चिमेतील कोपर पुलाजवळील रिक्षामध्ये हे बालक सुखरूप आढळून आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बालकाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी २ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास कुर्ल्यातील विनोबा भावे नगर परिसरात राहणाऱ्या अमन सकट या मूकबधिर तरुणाचा त्याच्या मामासोबत वाद झाला. या वादाच्या रागातून त्याने मामाच्या एक वर्षीय मुलाला घरातून उचलून नेले. काही वेळाने बालक बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर आईने विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी बालकाचा फोटो व माहिती तातडीने सोशल मीडियावर प्रसारित केली. दरम्यान, दुपारी डोंबिवली पश्चिमेतील कोपर पुलाजवळील रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या एका रिक्षामध्ये लहान मूल रडत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ विष्णूनगर पोलिसांना माहिती दिली.
विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालकाला ताब्यात घेतले. सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या छायाचित्राशी पडताळणी केल्यानंतर हेच अपहरण झालेले बालक असल्याची खात्री झाली. त्यानंतर विनोबा भावे नगर पोलिसांशी समन्वय साधून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि बालकाला सुखरूप आईच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी अपहरण करून फरार झालेल्या अमन सकटचा शोध विनोबा भावे नगर पोलीस घेत असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi