डॉ डी. वाय. पाटील यांच्या पार्थीवावर बुधवारी अंत्यसंस्कार
कोल्हापूर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कार्यतपस्वी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर
पद्मश्री डॉ डी. वाय पाटील यांचे पार्थिव


कोल्हापूर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कार्यतपस्वी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांचे माजी राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी समर्पित केले.

एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास पुढे व्यापक स्वरूपात विस्तारला. सुमारे दोनशे संस्था, विविध प्रकारची आठ विद्यापीठे आणि हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य त्यांनी केले.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर यांसारख्या विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि आधुनिक सुविधा उभारून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राची ओळख देशभर निर्माण झाली.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या संस्थांमुळे वैद्यकीय सुविधा आणि आरोग्यसेवेचे जाळेही विस्तारले. त्यांनी राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला असून राज्याच्या राजकारणात दोन वेळा विधानसभा सदस्य म्हणून काम केले.

मात्र, शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातच त्यांचे मन अधिक रमले. या माध्यमातून त्यांनी अनेक भव्य शैक्षणिक संकुले उभारली तसेच डॉ. डी.वाय पाटील इंटरनॅशनल स्टेडियम सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारले.

डॉ. पाटील हे सहकार, शिक्षण, सांस्कृतिक-साहित्यिक आणि सामाजिक चळवळीचे आधारवड मानले जात होते. संपूर्ण आयुष्यात त्यांनी शिक्षण, सेवा आणि विनम्रतेची मूल्ये जपली.

त्यांनी रुजवलेली शिक्षणसेवेची परंपरा, समाजहिताची भावना आणि विनम्रतेचा आदर्श पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या निधनाने एका दूरदर्शी शिक्षण महर्षीचा अंत झाला आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande