
पुणे, ४ ऑगस्ट (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे परिवहन संवर्गातील वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. खासगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक तीनपट व नियमित शुल्क भरून राखीव ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी ६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज, डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील खासगी वाहन विभागात अर्ज सादर करावेत.
एका क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. या अर्जांसाठी लिलावाचे डीडी ७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सभागृहात लिलाव प्रक्रिया पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातील आकर्षक व पसंतीच्या क्रमांकांसाठी अर्ज ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. या अर्जांसाठीचे लिलाव डीडी १० ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्यानंतर दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात लिलाव आयोजित करण्यात येणार आहे.
लिलावासाठी सादर करण्यात येणारे डीडी “R.T.O., Pimpri Chinchwad” या नावाने नॅशनलाइज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचे असणे आवश्यक असून ते दोन महिन्यांपेक्षा जुने नसावेत. प्रत्येक अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक राहील.
लिलावासाठी सादर करण्यात येणारा डीडी बंद पाकिटात एका अर्जासोबतच ग्राह्य धरला जाईल. “Pimpari Chinchwad R.T.O.” या नावाने सादर केलेले किंवा विहित शुल्कापेक्षा कमी रकमेचे डीडी बाद करण्यात येतील. तसेच एकाच अर्जदाराने एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक पाकिटे सादर केल्यास संबंधित अर्ज रद्द करण्यात येईल.
लिलाव प्रक्रियेदरम्यान एखाद्या पसंतीच्या क्रमांकासाठी समान रकमेचे डीडी प्राप्त झाल्यास, संबंधित क्रमांकाची निवड अर्जदारांच्या नावांच्या चिठ्ठ्या टाकून करण्यात येईल. अर्जदार उपस्थित असो किंवा नसो, लिलाव प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८१ मधील नियम ५४ अ नुसार पसंतीचा नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याची वैधता १८० दिवसांची आहे. मात्र, NIC Portal वरील बदलांमुळे वैधता संपलेले पसंती क्रमांक पुन्हा नागरिकांसाठी पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत.
लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पसंती क्रमांकांचे वितरण ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल. नागरिकांना फॅन्सी नंबर पोर्टल या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज व शुल्क भरून पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करता येणार आहे. यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु