
नंदुरबार, ४ ऑगस्ट (हिं.स.) :एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘प्रकाशवाटा 2026’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE Main आणि MHT-CET (PCM) या स्पर्धा परीक्षांच्या मोफत निवासी मार्गदर्शनासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी याबाबत माहिती दिली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी दर्जेदार निवासी प्रशिक्षण व तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.
पात्रता निकष :
विद्यार्थी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा.
विद्यार्थी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा.
विद्यार्थ्याने NEET, JEE Main किंवा MHT-CET (PCM) यापैकी किमान एक स्पर्धा परीक्षा दिलेली असावी.
विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्याचा रहिवासी असावा.
अर्ज प्रक्रिया :
ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी तसेच संबंधित स्पर्धा परीक्षेचे गुणपत्रक (Score Card PDF) अपलोड करणे अनिवार्य आहे.
पात्र विद्यार्थी अधिकृत Google Form द्वारे अर्ज सादर करू शकतात.
अधिक माहिती व संपर्कासाठी विद्यार्थी भ्रमणध्वनी क्रमांक 9552565905 / 9599576365 वर संपर्क साधू शकतात.
तसेच प्रत्यक्ष संपर्कासाठी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार येथे भेट देता येईल.
जिल्ह्यातील सर्व पात्र आणि इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या मोफत निवासी प्रशिक्षणाच्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर