
बीड, ४ ऑगस्ट (हिं.स.) : परळी वैद्यनाथ तालुका आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यविषयक समस्या तातडीने सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. कोणतेही डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसणे किंवा सुट्टीच्या दिवशी रुग्णांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व डॉक्टरांशी समन्वय साधून उपाययोजना करण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार धनंजय मुंडे यांनी केले.परळी वैद्यनाथ नगर परिषदेच्या सभागृहात आरोग्यवर्धिनी समितीची बैठक आमदार धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
रुग्णांना सुट्टीच्या दिवशीही आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले. तसेच औषध फवारणी, लसीकरण यांसारख्या आरोग्यविषयक उपक्रमांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवा आणि रुग्णसेवेचे काम प्रभावीपणे सुरू असून, रुग्णांच्या सोयीसाठी दर महिन्याला समितीची बैठक घेण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीस नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी राजा खान, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुट्टे, तहसीलदार विनोद रणवारे, मुख्याधिकारी श्री. निघळ यांच्यासह सर्व सभापती, सर्वपक्षीय गटनेते आणि नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा . पद्मश्री यांच्यासह विविध नगरसेवकांनी आरोग्यविषयक प्रश्नांवर आपली मते मांडली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis