
लातूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अंदाजे ६५ वर्षीय महिला एकट्या उभ्या असल्याचे आढळून आले. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांना बेलकुंड येथे जायचे असल्याचे समजले. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना राजीव गांधी चौक येथे नेण्यात आले.
राजीव गांधी चौकात पोहोचल्यानंतर बेलकुंडकडे जाणारी शेवटची बस निघून गेल्याचे समोर आले. त्यानंतर महिलेने दिलेल्या घरच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. संबंधितांकडून महिलेला लॉजमध्ये थांबविण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही समजले.
महिलेची सुरक्षितता लक्षात घेऊन तातडीने ‘११२’ या आपत्कालीन सेवेशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर विवेकानंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी भुजबळ आणि माऊली फड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेच्या गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून त्यांना सुरक्षितपणे गावी रवाना करण्याची व्यवस्था केली.
या संपूर्ण घटनेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. एका असहाय्य वृद्ध महिलेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केलेल्या या मदतीमुळे पुन्हा एकदा वर्दीतील माणुसकी'चा प्रत्यय आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis