
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात विजेत्यांचा गौरव
परभणी, ४ ऑगस्ट (हिं.स.) : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ येथील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थीनी प्रतीक्षा लक्ष्मण केंद्रे हिने प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले.
स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संदिपकुमार देवराये होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी करण्यात आलेल्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव जोपासण्याचे आवाहन केले.
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रतीक्षा लक्ष्मण केंद्रे हिने प्रथम क्रमांक, व्हिजन पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी पूजा नामदेव गव्हाडे हिने द्वितीय, तर कै. रमेश वरपुडकर उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी सलोनी भागवत गायकवाड हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हे व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुरेश मोरे, मुख्याध्यापक राजकुमार धबडे, अंकुश परांडे आणि प्रकाश राठोड यांनी केले. यावेळी विद्यार्थी विशाल पवार यांनी ग्रंथदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
कार्यक्रमास प्रा. डॉ. गोविंद वाकणकर, प्रा. डॉ. अंगद फाजगे, प्रा. डॉ. अनंतकुमार सरकाळे, प्रा. सुरेश मोरे, प्रा. सतीश वाघमारे, प्रा. संतोष वडकर, प्रा. आरबाड, प्रा. मोईन शेख यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय जाधव यांनी केले. प्रा. मेघा कुरूडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली, ममता कुरूडे यांनी सूत्रसंचालन केले, तर विभागप्रमुख प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी उपस्थितांचे आभार मानले.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis