
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाचे माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला.
प्रवीण टाके यापूर्वी कोल्हापूर येथे उपसंचालक म्हणून कार्यरत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात २००८ ला रुजू झाल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर मुंबई मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक असताना ‘लोकराज्य’चे ते कार्यकारी संपादक होते. चंद्रपूर, नागपूर व नांदेड याठिकाणी त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्य केले आहे. शासन सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना सन २०१९ - २० वर्षाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
पत्रकारितेतील स्नातकोत्तर पदवी प्राप्त असलेले प्रवीण टाके यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा स्व.वसंतराव ओगले पुरस्कार प्राप्त आहे. शासनात येण्यापूर्वी त्यांनी जवळपास १४ वर्ष नागपूर पत्रिका, तरुण भारत, सामना आणि लोकमत वृत्तपत्रात विविध पदावर कार्य केले आहे. त्यांची फकीर ही चरित्र कादंबरी प्रकाशित झाली आहे. वऱ्हाडी भाषेतील स्तंभकार, कवी, लेखक म्हणून त्यांची ओळख असून विविध सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. विभागीय माहिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अधिकारी,कर्मचा-यांनी त्यांचे स्वागत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis