अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
अमरावती, ४ ऑगस्ट (हिं.स.) : चांदूररेल्वे तालुक्यात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती व पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली चांदूररेल्वे तालुका
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन, विलंब झाल्यास आंदोलनाचा इशारा


अमरावती, ४ ऑगस्ट (हिं.स.) : चांदूररेल्वे तालुक्यात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती व पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली चांदूररेल्वे तालुका व शहर काँग्रेस कमिटीने सोमवारी तहसीलदारांना निवेदन सादर केले.

निवेदनात कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकामार्फत तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतीसाठी प्रति हेक्टर किमान ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.

नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे आणि धामणगावरेल्वे तालुक्यांत २०० ते २५० मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे पिकांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने कोणताही विलंब न करता पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत जाहीर करावी, अशी भूमिका काँग्रेसने मांडली.

यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, असे आवाहन केले. शासनाने नुकसानभरपाईचे वितरण तातडीने न केल्यास शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

यावेळी गणेश आरेकर, प्रभाकर वाघ, राजेंद्र राजनेकर, बाळासाहेब ठाकरे, अमोल होले, गोविंद देशमुख, श्रीनिवास सूर्यवंशी, प्रफुल्ल कोकाटे, शिट्टू सूर्यवंशी, अनिस सौदागर, रावसाहेब शेळके, हरिभाऊ ठाकरे, नितीन कोपरकर, दिनेश देशमुख, दत्ता भुयार, राजू लांजेवार, प्रवीण चिचे, गीतेश सिंग ठाकूर, अर्जुन देशमुख, अरुण वाहने, सचिन वाहने, सुधीर नलगे, सक्षम वानखडे, पंकज मेश्राम यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande