सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय
मुंबई, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच सरकारी वकील कार्यालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय


मुंबई, 04 ऑगस्ट, (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच सरकारी वकील कार्यालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या न्यायिक अधिकारी व सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या पदांमधून या न्यायालयासाठी जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या एक पदासह न्यायालयासाठी २० नियमित पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच वाहनचालक, पुस्तकबांधणीकार, शिपाई, पहारेकरी आणि सफाईगार यांसह पाच पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय, सरकारी वकील कार्यालयासाठी तीन नियमित पदे आणि एक बाह्य यंत्रणेमार्फत पद मंजूर करण्यात आले आहे. अशाप्रकारे न्यायालय व सरकारी वकील कार्यालयासाठी मिळून २३ नियमित आणि ६ बाह्य यंत्रणेमार्फत पदे, अशी एकूण २९ पदांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे सिल्लोड व परिसरातील नागरिकांना जिल्हा व सत्र न्यायालयीन कामकाजासाठी दूरवर जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवर न्यायसेवा उपलब्ध झाल्याने न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान, सुलभ आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande