
छत्रपती संभाजीनगर, ४ ऑगस्ट (हिं.स.) : सशस्त्र दलातील भूतपूर्व सैनिक तसेच वने व हवामान बदल मंत्रालय (MoEF&CC) आणि राज्य वन विभागातील भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) इको महार अंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी निर्धारित वेळ, दिनांक व ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिला टप्पा 1 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा एलआय, कोल्हापूर येथे होणार आहे. तर दुसरा टप्पा 8 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान एआरओ ग्राउंड, छत्रपती संभाजीनगर येथे दररोज सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होईल.
या भरतीमध्ये जेसीओ – 4 आणि सोल्जर (जीडी) – 162 पदे केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. तसेच ट्रेड्समन – 15, सोल्जर क्लार्क (जीडी) – 7, हेअर ड्रेसर – 1, मेस कीपर – 1, स्टिवर्ड – 1, हाऊस कीपर – 1, शेफ कम्युनिटी – 2 आणि वॉशरमन – 2 अशी पदे संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांसाठी खुली आहेत.
भरतीसाठी उमेदवार हा सशस्त्र दलातील निवृत्तिवेतनधारक भूतपूर्व सैनिक किंवा वने व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागात किमान 20 वर्षे सेवा केलेला भूतपूर्व महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. सेवानिवृत्ती अथवा सेवामुक्तीच्या तारखेपासून भरतीच्या तारखेपर्यंत पाच वर्षांच्या आत नोंदणी झालेली असावी. उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी ‘शेप-1’, चारित्र्य अनुकरणीय किंवा अतिशय चांगले असणे आवश्यक असून कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणात सहभाग नसावा.
उमेदवारांनी मूळ पीपीओ (निवृत्तिवेतन आदेश), डिस्चार्ज बुक व त्याची स्वयं-साक्षांकित प्रत, अधिवास प्रमाणपत्र, भूतपूर्व सैनिक ओळखपत्र, अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराची 10 छायाचित्रे तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
भूतपूर्व सैनिकांसाठी कागदपत्र पडताळणी, एक मैल धाव, पुल-अप्स, बॅलन्स बीम, मुलाखत, वनीकरण व रोपवाटिकेशी संबंधित प्रावीण्य चाचणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांतून निवड प्रक्रिया होईल. तर भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी कागदपत्र पडताळणी, मुलाखत, वनीकरण व रोपवाटिकेतील प्रावीण्य चाचणी आणि वैद्यकीय तपासणी घेण्यात येणार आहे.
शारीरिक पात्रतेनुसार भूतपूर्व सैनिकांसाठी किमान उंची 160 सेंमी (गोरखा, गढवाली व आसामी उमेदवारांसाठी 152 सेंमी), तर भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी 150 सेंमी निश्चित करण्यात आली आहे. भूतपूर्व सैनिकांचे किमान वजन 50 किलो आणि महिला उमेदवारांचे किमान वजन 42 किलो असणे आवश्यक आहे.
निवड गुणवत्ता व उपलब्ध रिक्त पदांच्या आधारे करण्यात येणार असून, इको टेरिटोरियल आर्मीमधील सेवा निवृत्तिवेतनासाठी पात्रता राहणार नाही. प्रारंभी दोन वर्षांसाठी नियुक्ती देण्यात येईल. कामगिरी समाधानकारक असल्यास एक वर्षाची मुदतवाढ दिली जाऊ शकते. भूतपूर्व सैनिक जेसीओंना 55 वर्षांपर्यंत, तर शिपायांना 50 वर्षांपर्यंत सेवा करता येईल. निवड झाल्यानंतर देशात कुठेही सेवा करण्याची तयारी उमेदवारांनी ठेवावी लागेल. भूतपूर्व सैनिकांचे विद्यमान निवृत्तिवेतन मात्र अबाधित राहणार आहे.
भरती प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे. भरतीदरम्यान मोबाईल फोनला परवानगी राहणार नाही. उमेदवारांनी कोणत्याही दलालांच्या किंवा आमिषांच्या भूलथापांना बळी पडू नये. लाच देणे, खोटी कागदपत्रे सादर करणे, माहिती लपविणे किंवा कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्यास उमेदवारी रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
निर्धारित दिनांक, वेळ आणि ठिकाणी उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. अधिक माहितीसाठी 9168168136 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis