
रायगड, ४ ऑगस्ट (हिं.स.) :रायगड जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून नियमित शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला असतानाही अनेक शाळांमध्ये नियमित वेळापत्रकानुसार अध्यापन सुरू होऊ शकलेले नाही.
गणित, विज्ञान आणि इंग्रजी या महत्त्वाच्या विषयांच्या शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. उपलब्ध शिक्षकांवर दोन ते तीन विषय शिकविण्याची जबाबदारी येत असल्याने अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
सन २०१७ पूर्वी शिक्षक भरतीचे अधिकार शाळा व्यवस्थापनाकडे होते. त्यामुळे रिक्त पदे वेळेत भरली जात होती. मात्र, ‘पवित्र’ पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया शासनाच्या अखत्यारित गेल्यानंतर अनेक शिक्षक पदे वर्षानुवर्षे रिक्त राहिली आहेत.
सध्या रायगड जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये १,९०८ शिक्षक कार्यरत असून त्यामध्ये २७८ मुख्याध्यापकांचा समावेश आहे. मात्र, शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने अनेक शाळांमध्ये नियमित तासिका घेण्यात अडचणी येत आहेत.
यंदा मतदार यादी विशेष पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. अनेक शाळांमध्ये तासिका विस्कळीत झाल्या असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांना तास न होता रिकामे बसावे लागत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काही शैक्षणिक संस्था स्वतःच्या खर्चातून तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती करत आहेत. मात्र, नियमित भरती झाल्यानंतर या नियुक्त्यांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने संस्था चालकांसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्याची मागणी पालक, शिक्षक संघटना आणि शिक्षण संस्थांकडून करण्यात येत आहे. पवित्र पोर्टलवर आवश्यक शिक्षकांची मागणी नोंदवण्यात आली आहे. एसआयआर मोहिमेमुळे शिक्षकांची कमतरता अधिक जाणवत आहे. पुढील एक ते दोन महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी दिली.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)