
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात १ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसेच २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभर विविध पक्ष,संघटना व मंडळांकडून मिरवणुका,रॅली आणि शोभायात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.या मिरवणुकांदरम्यान प्लाझ्मा, बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये संपूर्ण जिल्ह्यात १ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत अशा प्रकाशयंत्रांच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मिरवणुका,रॅली व शोभायात्रांमध्ये प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे सहभागी नागरिक तसेच मिरवणूक पाहण्यासाठी आलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या डोळ्यांना इजा होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.तसेच या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात किंवा अनुचित प्रकार घडण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ (१) मध्ये नागरिकांच्या जीवितास किंवा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याची तरतूद आहे.त्यानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व ईद-ए-मिलाद निमित्त होणाऱ्या मिरवणुका,रॅली व शोभायात्रा शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांच्या डोळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर कटाक्षाने टाळणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ च्या कलम १६३ अन्वये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व ईद-ए-मिलाद निमित्त १ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व मिरवणुका,रॅली आणि शोभायात्रांमध्ये प्लाझ्मा, बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर करण्यास निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis