

वीज, घरकुल, आरोग्य, शिक्षणासह विविध विषयांवरील निवेदनांची घेतली दखल
परभणी, ४ ऑगस्ट (हिं.स.) : शिवसेनेचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सईद खान यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही केली. जनतेच्या सेवेसाठीच जनता दरबार आयोजित करण्यात येत असल्याचे आमदार खान यांनी यावेळी सांगितले.
पंचायत समिती सभागृह, पाथरी येथे आयोजित जनता दरबारात तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांशी आमदार सईद खान यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेत त्यांनी संबंधित विषयांवर चर्चा केली.
वीज, घरकुल, आरोग्य, शिक्षण, शासकीय योजनांचा लाभ तसेच विविध प्रशासकीय विषयांवरील निवेदने यावेळी स्वीकारण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत अनेक प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. तसेच प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी आमदार सईद खान म्हणाले, जनता दरबार हा केवळ तक्रारी ऐकण्याचा उपक्रम नसून जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक नागरिकाला न्याय, पारदर्शक प्रशासन आणि विकासाचा लाभ मिळावा, यासाठी माझा सातत्यपूर्ण प्रयत्न कायम राहील.
जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशासन आणि जनतेतील समन्वय वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis