
जळगाव, ४ ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याची योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या एकूण प्रकल्प किमतीतील २५ टक्के हिस्स्यापैकी जास्तीत जास्त १५ टक्के मार्जिन मनी शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
लाभार्थ्याने प्रकल्प किमतीतील १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर आणि बँकेकडून स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर उर्वरित १५ टक्के मार्जिन मनी शासनामार्फत देण्यात येईल.
या योजनेमुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नवउद्योजकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क साधावा.
यावेळी सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर