
रायगड, ४ ऑगस्ट (हिं.स.) :समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबविणारे अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत अलिबाग शहरातील विविध वृत्तपत्र कार्यालयांना पावसाळी छत्र्यांचे वाटप केले.
पत्रकारांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या दैनंदिन कामात मदत व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पत्रकारांकडून स्वागत करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम म्हणून त्याची शहरात चर्चा होत आहे.पावसाळ्यात मुसळधार पाऊस, प्रतिकूल हवामान आणि दुर्गम भागात जाऊन वृत्तसंकलन करण्याची जबाबदारी पत्रकारांवर असते. पूरस्थिती, अपघात, नैसर्गिक आपत्ती तसेच विविध सामाजिक घटनांचे वार्तांकन करताना पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन त्यांना पावसापासून संरक्षण मिळावे आणि कामासाठी आवश्यक आधार मिळावा, या हेतूने सचिन घाडी यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी त्यांनी अलिबाग शहरातील विविध वृत्तपत्रांच्या कार्यालयांना भेट देऊन पत्रकारांना पावसाळी छत्र्यांचे वितरण केले. पत्रकार हे समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून लोकहिताचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे तसेच जनतेपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा छोटासा प्रयत्न असल्याचे सचिन घाडी यांनी सांगितले.
------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)