यवतमाळ नगरपालिकेचा कारभार गोंधळाचा; डॉ. नदीम यांची नगराध्यक्षांवर टीका
यवतमाळ, ४ ऑगस्ट (हिं.स.) : नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यानंतर नियोजित दुसरी सर्वसाधारण सभा प्रशासकीय कारण देत १९ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली. तसेच सोमवारी झालेली स्थायी समितीची बैठक बेका
पुसद नगराध्यक्षांना पालिका कामकाजाचे गांभीर्य नाही


यवतमाळ, ४ ऑगस्ट (हिं.स.) : नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यानंतर नियोजित दुसरी सर्वसाधारण सभा प्रशासकीय कारण देत १९ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली. तसेच सोमवारी झालेली स्थायी समितीची बैठक बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते डॉ. मोहम्मद नदीम यांनी केला आहे.

नगरपालिकेच्या कारभारावर टीका करताना डॉ. नदीम म्हणाले की, नगराध्यक्षांना पालिका कायद्याची पुरेशी माहिती नसल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे. सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याचे देण्यात आलेले प्रशासकीय कारण योग्य नसून, नियोजित दिवशी सभा घेऊन त्यामध्ये अध्यक्षांनी निर्णय घेणे अपेक्षित होते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) गटनेते डॉ. अकील मेमन, नगरसेवक अॅड. भारत जाधव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन नाईक, इस्तियाक यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

नगरसेवकांना देण्यात आलेल्या सूचनापत्रात नगरसेवकांच्या नावांचा उल्लेख नसल्याचा तसेच सभेच्या कामकाजातील नियमानुसार मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याचा पहिला मुद्दाही वगळण्यात आल्याचा आरोप डॉ. नदीम यांनी केला. नगरपालिका घरगुती पद्धतीने चालविण्याचा प्रयत्न होत असून, टेंडर व्यवस्थापन आणि कमिशनवरच भर दिला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, नगरसेवक अॅड. भारत जाधव यांनी स्थायी समितीच्या दोन बैठका झाल्या असल्या तरी त्यांचे कार्यवृत्त उपलब्ध नसल्याचे सांगितले. शहराच्या विकासाबाबत नगराध्यक्ष गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले असून, त्यानंतर तातडीने काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश असतानाही कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर टाकण्यात येणाऱ्या मुरुमाच्या निविदेचा विषय ऑगस्ट महिन्यात स्थायी समितीसमोर आणण्यात आल्याचे सांगत त्यांनी पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande