
अमरावती, ४ ऑगस्ट (हिं.स.) : राज्य परिवहन महामंडळाच्या वरुड बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे छताचे प्लॅस्टर कोसळणे, पावसाळ्यात गळती, पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि सुरक्षेचा अभाव अशा गंभीर समस्यांमुळे हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही परिवहन प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अमरावती जिल्ह्याच्या पूर्वेकडील शेवटच्या टोकावर असलेला वरुड तालुका हा अमरावती, नागपूर, वर्धा तसेच मध्य प्रदेशातील बैतूल आणि पांढूर्णा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात.
सन १९८२ मध्ये उभारण्यात आलेल्या बसस्थानक आणि आगाराला तब्बल ४४ वर्षे पूर्ण झाली असून, कालांतराने इमारतीची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. बसस्थानकासह आगार, आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान, चालक-वाहकांचे विश्रामगृह तसेच महिला व पुरुष स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी बसस्थानकाची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप होत असून दुरुस्तीनंतरही छताचे प्लॅस्टर वारंवार कोसळत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी छताला गळती लागत असल्याने प्रवाशांना बसस्थानकात उभे राहणेही धोकादायक ठरत आहे.
याशिवाय बसस्थानकातील पाणपोई अनेक दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसस्थानकाची तातडीने दुरुस्ती करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी