हिंगोलीत भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेबाबत मुख्याध्यापक व प्राचार्यांची कार्यशाळा
महाडीबीटीवरील अडचणी दूर करण्यासाठी शंभर टक्के मॅपिंग व नोंदणीवर भर छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी महाडीबीटी संक
Q


महाडीबीटीवरील अडचणी दूर करण्यासाठी शंभर टक्के मॅपिंग व नोंदणीवर भर

छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये आणि वरिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथील सभागृहात झालेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे होत्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक श्रीमती सुनीता शिंदे, सहायक संचालक तथा सहायक सरकारी अभियोक्त्या श्रीमती देवयानी सरदेशपांडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी आणि बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीची शंभर टक्के प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संस्थास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नियोजनबद्ध कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचे शंभर टक्के मॅपिंग व नोंदणीचे निर्देश

शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळा-महाविद्यालयांमधील युडायस+ नुसार प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा आधार आधारित डेटाबेस तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मागील वर्षी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या किंवा अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा यावर्षी शंभर टक्के समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले.

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, बँक खाते, एनपीसीआय मॅपिंग आणि आधार संलग्नतेसाठी भारतीय पोस्ट बँक तसेच स्थानिक बँकांच्या सहकार्याने विशेष शिबिरे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला तसेच बँक खात्याशी संबंधित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शिष्यवृत्ती मदत केंद्र आणि नियमित आढाव्यावर भर

ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीची माहिती पोहोचविण्यासाठी दवंडी, माहितीपत्रके तसेच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयात ‘शिष्यवृत्ती मदत केंद्र’ आणि हेल्पलाइन कार्यरत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याबरोबरच मागील वर्षी अर्ज बाद झालेल्या कारणांचे वर्गीकरण करून भविष्यात अशा त्रुटींची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

शिष्यवृत्ती अर्जाच्या प्रगतीचा जिल्हास्तरावर दर सोमवारी आढावा घेण्यात येणार असून सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांनी अर्जांची अद्ययावत माहिती दर सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत सुरेश पठाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक राजू ससाणे यांनी केले. कार्यशाळेस हिंगोली जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच शिष्यवृत्ती कामकाज पाहणारे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande