
सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तथा दिव्यांग समाज कल्याण अधिकारी सचिन नागनाथ जगताप यांचा उल्लेखनीय आणि उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
शिक्षण, दिव्यांग कल्याण आणि सामाजिक न्यायाशी संबंधित विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा पारदर्शकपणे लाभ पोहोचविणे तसेच प्रशासनात प्रभावी समन्वय साधत केलेल्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना सभापती संस्कृती सातपुते म्हणाल्या, लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव होणे आवश्यक आहे. सचिन जगताप यांनी शिक्षण आणि दिव्यांग कल्याण क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी असून अशा अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होतो.
सत्काराला उत्तर देताना सचिन नागनाथ जगताप यांनी हा सन्मान संपूर्ण सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भविष्यातही कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या सत्कार समारंभास जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड