पूरग्रस्तांच्या अनुदान वितरणाला संथ गती; हजारो शेतकरी प्रतीक्षेत
ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे १,५४३ शेतकऱ्यांचे ९.२३ कोटी अडकले सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीची जमीन खरडून गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या अनुदानाचे वितरण अद्यापही सं
पूरग्रस्तांच्या अनुदान वितरणाला संथ गती; हजारो शेतकरी प्रतीक्षेत


ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे १,५४३ शेतकऱ्यांचे ९.२३ कोटी अडकले

सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीची जमीन खरडून गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या अनुदानाचे वितरण अद्यापही संथ गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील २० हजार ४६८ बाधित शेतकऱ्यांसाठी ५७ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असले, तरी मोठ्या संख्येने शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत.

प्रशासनाने पंचनाम्याच्या आधारे १३ हजार २०४ शेतकऱ्यांसाठी २२ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. मात्र, आजपर्यंत केवळ ९ हजार ४६८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ११ कोटी १४ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे १० हजार ९५३ शेतकऱ्यांना सुमारे ४६ कोटी ४४ लाख रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे १ हजार ५४३ शेतकऱ्यांचे सुमारे ९ कोटी २३ लाख रुपयांचे अनुदान रखडले आहे. याशिवाय बँक खात्यांतील त्रुटी आणि इतर तांत्रिक अडचणींमुळेही अनेक पात्र लाभार्थ्यांना मदत मिळालेली नाही.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार मोहोळ तालुक्यात सर्वाधिक २ हजार ७३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ कोटी ५ लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. तसेच करमाळा, माळशिरस, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांनाही अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.

मात्र, अद्याप मदतीपासून वंचित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.------------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande