
पुणे, ४ ऑगस्ट (हिं.स.) :विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा लठ्ठपणा, मधुमेह आणि अयोग्य आहाराच्या सवयींना आळा घालण्यासाठी शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूडची विक्री, जाहिरात आणि वितरणावर बंदी घालण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने जारी केले आहेत. मात्र, पुण्यातील अनेक शाळांच्या परिसरातील सद्यस्थिती पाहता या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
राज्य सरकारने शाळेच्या आवारात तसेच शाळेपासून ५० मीटर अंतराच्या परिसरात जंक फूडची विक्री, जाहिरात किंवा वितरण करण्यास मनाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मात्र, या आदेशाची अधिकृत प्रत अद्याप प्राप्त झालेली नसल्याचे मुख्याध्यापक संघटनेने स्पष्ट केले आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवघ्या दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात अनेक नामांकित शाळा आहेत. या भागात सकाळपासून सायंकाळपर्यंत हजारो विद्यार्थी आणि पालकांची मोठी वर्दळ असते.
शाळांच्या आसपासच्या परिसरात जंक फूड विकणाऱ्या टपऱ्या, हातगाड्या तसेच लहान-मोठे खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ५० मीटरच्या बंदीची अंमलबजावणी करणे प्रशासनासाठी सोपे नसल्याचे चित्र आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रभावी नियोजन, नियमित तपासणी आणि सातत्यपूर्ण कारवाई झाली नाही तर हा नियम केवळ कागदावरच राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचा आदेश पुणे महापालिकेला प्राप्त झाला असून, महापालिका हद्दीतील शाळांच्या परिसरात लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे यांनी दिली.
शाळांच्या परिसरातील जंक फूड विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागांच्या समन्वयातून नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु