
पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यातील खासगी वाहनांवर'पोलीस'अशी लाल रंगाची पाटी लावून तिचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक (DGP) कार्यालयाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.
परिपत्रकानुसार, काही पोलीस अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी आपल्या खासगी वाहनांवर'पोलीस'अशी लाल पाटी लावतात. त्यामुळे तपासणी नाक्यांवर अशा वाहनांची तपासणी अनेकदा टाळली जाते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक बनावट'पोलीस'पाट्या लावून अवैध धंदे, गुन्हेगारी कृत्ये आणि इतर बेकायदेशीर कामांसाठी वाहनांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर अशा पाट्या लावून फिरणाऱ्या खासगी वाहनांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९मधीलनियम १२२(६)तसेचमोटार वाहन अधिनियम, १९८८मधीलकलम १७७अंतर्गत संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
पोलीस यंत्रणेला अशा प्रकारच्या गैरवापरावर प्रभावी नियंत्रण ठेवून तपासणी नाक्यांवरील अंमलबजावणी अधिक कडक करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु