
भाजप देशमुख गटाचा महापालिका आयुक्तांना इशारा
सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) : सोलापूर महापालिकेतील कथित नालेसफाई घोटाळ्याच्या चौकशीला गती देत, चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी भाजपच्या देशमुख गटातील नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी तसेच चौकशी प्रक्रियेवर कोणताही प्रभाव पडू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्पुरते कार्यमुक्त करण्याची आवश्यकता असल्याचे नगरसेवकांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नालेसफाई कामांमध्ये कथित अनियमिततेचा आरोप करत भाजप देशमुख गटाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना पदाच्या जबाबदारीपासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या मागणीवर तातडीने निर्णय न घेतल्यास महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भाजप देशमुख गटाने दिला आहे.
या मागणीमुळे नालेसफाई घोटाळ्याच्या मुद्द्यावर महापालिकेतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आयुक्त प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड