पंढरपूरला दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
रखडलेल्या खरीप पेरण्यांना मिळणार गती, शहरातील घाणही वाहून गेली सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :जवळपास दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी दुपारी पंढरपूर शहर आणि तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी निर्मा
rain


रखडलेल्या खरीप पेरण्यांना मिळणार गती, शहरातील घाणही वाहून गेली

सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :जवळपास दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी दुपारी पंढरपूर शहर आणि तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना आता गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

जूनच्या सुरुवातीपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. अधूनमधून झालेल्या हलक्या सरींमुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला नाही. परिणामी पिकांमध्ये रोगराई वाढण्यास पोषक वातावरण तयार झाले आणि शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू होती.

दरम्यान, उजनी आणि वीर धरणांतून भीमा नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीला पूर आला होता. मात्र, नदीतील पाण्याचा शेतीसाठी थेट उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडेच लागल्या होत्या.

ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशावाद निर्माण झाला आहे. खरीप हंगामातील पेरण्या आणि पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस अनुकूल ठरणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

नीरा उजवा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असले, तरी ते शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. पाण्याअभावी अनेक पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत झालेल्या दमदार पावसामुळे शेतीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, आषाढी यात्रेनंतर शहरात साचलेली घाण, चिखल आणि दुर्गंधीही पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहून गेली. त्यामुळे शहरातील रस्ते, मोकळ्या जागा आणि उपनगरीय परिसर स्वच्छ होण्यास मदत झाली असून नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande