पुणे महापालिकेत १४६ स्वच्छतागृहांच्या कामांचे प्रस्ताव
पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून त्यांची स्थिती सुधारण्याऐवजी ती पाडून नव्याने उभारण्यावर नगरसेवकांचा अधिक भर असल्याचे समोर आले आहे. महिला व बालकल्याण समितीसमोर सध्या १४६ सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या कामांचे प
pmc


पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून त्यांची स्थिती सुधारण्याऐवजी ती पाडून नव्याने उभारण्यावर नगरसेवकांचा अधिक भर असल्याचे समोर आले आहे. महिला व बालकल्याण समितीसमोर सध्या १४६ सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या कामांचे प्रस्ताव असून, त्यापैकी ५५ स्वच्छतागृहे पाडून नव्याने उभारण्याचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही स्वच्छतागृहे यापूर्वीच पाडण्यात आली असून, त्यासाठी आता प्रशासकीय मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही समोर आले आहे.

पुणे शहरातील अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. स्वच्छता आणि देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही अनेक ठिकाणी दुर्गंधी, अपुरा प्रकाश, तुटलेले नळ, खराब बेसिन आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. स्थापत्य आणि विद्युत दुरुस्तीसाठीही लाखो रुपयांचा खर्च होत असला, तरी प्रत्यक्षात सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रीय कार्यालयांकडून जुनी स्वच्छतागृहे पाडून नव्याने उभारण्याचे प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाकडून सर्वाधिक २४, वारजे-कर्वेनगरमधून १८ आणि धनकवडी-कात्रज विभागातून १५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. याशिवाय ढोले पाटील रस्ता, शिवाजीनगर-घोले रस्ता, सिंहगड रस्ता आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांनीही अशाच स्वरूपाचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले आहेत. या प्रस्तावांमुळे विद्यमान स्वच्छतागृहांची नियमित दुरुस्ती व देखभाल करण्याऐवजी नव्याने बांधकाम करण्याच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सार्वजनिक निधीच्या वापराबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande