
सोलापूर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय वाद अधिक तीव्र झाला असून, त्याचे पडसाद सोमवारी सोलापुरात उमटले. भाजपने संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केल्यानंतर ठाकरे सेनेने हुतात्मा चौकात आंदोलन करत राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर रविवारी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोमवारी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच ठिकाणी आंदोलन करत भाजपने आंदोलन केलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडून ती स्वच्छ केली. यावेळी आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची नोंद झाली. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलकांना ताब्यात घेतले. शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दावा केला की, खासदार संजय राऊत हे शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहेत. भाजपचे आंदोलन हे पालकमंत्र्यांच्या समर्थनासाठी केलेले दिखाऊ आंदोलन होते, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनात सहभागी झालेले काही कार्यकर्ते पालकमंत्र्यांचे लाभार्थी असल्याचाही दावा त्यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड