सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधिकेची जागतिक वैज्ञानिक परिषदेसाठी निवड
पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स विभागातील वरिष्ठ संशोधन फेलो तथा भौतिकशास्त्र विभागातील पीएच.डी. संशोधक सायली नीलिमा राजेश अतकरे हिची जर्मनी येथे होणाऱ्या ७५ व्या लिंडाऊ नोबेल लॉर
grdf


पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स विभागातील वरिष्ठ संशोधन फेलो तथा भौतिकशास्त्र विभागातील पीएच.डी. संशोधक सायली नीलिमा राजेश अतकरे हिची जर्मनी येथे होणाऱ्या ७५ व्या लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंगसाठी निवड झाली आहे. भारतातून निवड झालेल्या अवघ्या ११ युवा संशोधकांमध्ये तिचा समावेश असून, विद्यापीठासाठी ही अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे.

मूळची अमरावती येथील असलेल्या सायली अतकरे या डॉ. श्वेता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत. त्या Metal–Organic Frameworks (MOFs) आधारित प्रगत नॅनोमटेरियल्सचा वापर करून पर्यावरणातील विषारी प्रदूषक शोधण्यासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर्स विकसित करण्याच्या संशोधनात कार्यरत आहेत. पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि आधुनिक सेन्सर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते.

या परिषदेदरम्यान त्यांना MOFs क्षेत्रातील जागतिक ख्यातीचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ प्रा. ओमार याघी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सायली अतकरे म्हणाल्या, मोठ्या शहरात किंवा नामांकित संस्थेत शिक्षण घेतल्याशिवाय जागतिक स्तरावर यश मिळत नाही, हा समज चुकीचा आहे. मेहनत, जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवरील विश्वास असेल, तर छोट्या शहरातूनही जगातील सर्वोच्च व्यासपीठ गाठता येते. माझ्या या यशामागे आईची शिस्त, कुटुंबाचा विश्वास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आहे.

सायली यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. श्री समर्थ हायस्कूल, ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधनास सुरुवात केली.

संशोधन मार्गदर्शिका डॉ. श्वेता जगताप यांनी सांगितले की, सायली ही जिज्ञासू, अभ्यासू आणि सातत्याने परिश्रम करणारी संशोधक असून तिचे संशोधन 'केमिकल सोसायटी रिव्ह्यूज' सारख्या उच्च प्रभावी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. देशभरातील विविध वैज्ञानिक परिषदांमध्येही तिने उल्लेखनीय कामगिरी केली असून, लिंडाऊ परिषदेसाठी झालेली निवड ही तिच्या संशोधन गुणवत्तेची जागतिक पातळीवरील दखल आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande